सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

आठवण

कामं संपवून पाठ टेकवतो मी जमिनीला
पंख्याची घरघर आणि रात्र होत जाते गडद काळी
तसा उलगडतो आठवणींचा पट
एकामागून एक...

सारं सारं आठवतं मग
वेड्यासारखं भटकणं, सायकलवरची रपेट,
समुद्रावरचा प्रवास अन्
लोकलच्या गर्दीतून वाट काढण्यासाठी
केलेली जीवघेणी धडपड

माझ्याबद्दल जाणून घेण्याचा तुझा अट्टाहास
तुझं लाडीक बोलणं, खट्याळ हासणं
आणि कधीकधी उगाचच भांडणं
आठवतंय मला,
लेणी पाहत फिरताना
त्या दगडी शिल्पासारख्या तुझ्या अदा
आणि ते मनमोहक नृत्य

सर्रक्कन आकाशातून वीज चमकून जाते
पावसाची  रिपरिप रिपरिप
माझ्या लयबद्ध श्वासांचा आवेग
तुझ्या ह्रदयाची धडधड
यांचं एक सुरेल संगीत तयार होतं
तू माझ्या देहगंधाचं केलेलं कौतुक
आणि निजेतच मी तुला जवळ घेतल्याचा तो क्षण

दुसऱ्या दिवशी होळी
सकाळी-सकाळी माझ्या अंगावर
उपडी केलेली पाण्याची बादली
बिछाना ओला-ओला
नंतर तीच बादली तुझ्यावर उपडी
सारं घर ओलं-ओलं
त्यानंतर आपलं हसणंही पाण्यात भिजून गेलेलं

पाऊस तर केव्हाचा थांबलाय
मात्र आठवणींची बरसात होतेच आहे
होतेच आहे