बुधवार, २ जुलै, २०१४

शब्दांविना अडले काही

मी  भरून घेतो सारे 
ह्रद्याच्या काठोकाठ
शब्दातून देताना का
पाझरता होतो माठ
लहानपणी शाळेत वाचलेली ही कविता. ही पूर्ण कविता जशीच्या तशी आठवत नाहीये, पण कवितेच्या या ओळी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. का?, कुणास ठाऊक? पण या ओळी मला मनोमन पटतात, म्हणूनच कदाचित त्या लक्षात राहिल्या असाव्यात. बऱ्याचदा माझी अशी अवस्था होते. एखाद्या गोष्टीचं अंतर्रुप सुर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसतं मला पण ते व्यक्त करताना मात्र माझ्याकडील शब्द लुळे पडतात. एखादं गाणं, संगीत ऐकताना, सिनेमा, नाटक, चित्रे पाहताना, एखादी गोष्ट, एखादी चाल, गेयता, एखादी ओळ ह्रद्याला इतकी भिडून जाते की बस्स्सत्याची परिणीती म्हणजे अंगभर शहारे येतात, अंगात सर्रकन वीज चमकून जाते, डोळ्यांच्या कडा पाणावतात, कधी-कधी तर श्वासही कोंडला जातो. त्याचही मग ओझं वाटू लागतं मला. खरंच काही गोष्टी ह्रद्याच्या अगदी काठोकाठ भरून घेतो मी पण कुणाला त्याबद्दल सांगाव म्हटलं तर मला ते पूर्णपणे मांडताच येत नाही. किती जरी सांगितलं तरी बरंच काहीतरी सांगायचं राहून गेलं असं वाटतं. शब्दातून व्यक्त करताना माझाही माठ पाझरतोच.
काही जणांना जे वाटतं, प्रतीत होतं त्यांना ते शब्दात व्यक्त करण्याची जादू लाभते. अगदी सहजपणे ते लिहून जातात आणि ते वाचताना, पाहताना मात्र आपलं भावविश्व ढवळून निघतं. कधी-कधी तर असं वाटतं की, अरे, हेच तर आपल्याला उमगलंय, गवसलंय, हेच तर आपल्याला सांगायचं होतं पण साले शब्द पळून जातात आपल्या वेळीशब्द नेहमीच लपंडाव खेळतात माझ्याशी.
संदीपचं अजून उजाडत नाही गं…’ हे गाणं ऐकलं आणि खूप अस्वस्थ वाटू लागलं. जेव्हा-जेव्हा मी हे गाणं ऐकतो तेव्हा-तेव्हा अस्वस्थता दाटून येते पण माझ्या मित्रांना मात्र मी या गाण्याविषयी फारसं काही सांगू शकलो नाही. ते सारं आतमध्ये झिरपतं पण तो ओलावा दाखवता येत नाही. मग एके दिवशी सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीत सलीलने केलेलं या गाण्याचं सुरेख रसग्रहण छापून आलं आणि मी तर अचंबितच झालो. मी जे सांगण्यासाठी धडपडतोय त्याला सलीलने शब्दांची झालर दिली. त्यामुळे कित्येकांनी या गाण्यातील अस्वस्थता अनुभवली असेल. एखादी गोष्ट शब्दांत पकडून ठेवणे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. खासकरून जेव्हा ती आपल्या अंतर्मनात विलिन झालेली असते. बाह्यकाराचं स्वरूप स्पष्ट करणं सोप्पयं पण अंतर्मनाशी एकरूप झालेली गोष्ट कशी व्यक्त करणार? म्हणूनच या गाण्याची ही ओळ मला खूप भावते.
नक्षत्रांच्या गावातले
मला गवसले गूज
परि अक्षरांचा संघ

त्याला लाभणार नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा